
सेवा भारती बालिका छात्रावासातील विद्यार्थिनींच्या विविध कलागुणांना मिळाले व्यासपीठ
उज्जैन | सद्वार्ता
प्रसिद्ध नाटककार आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांची 136 वी जयंती सेवा भारती बालिका छात्रावासातील विद्यार्थिनींसोबत उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात छात्रावासातील विद्यार्थिनींनी समूहगीत, नृत्य, नाटिका, योग प्रात्यक्षिक, दंड प्रात्यक्षिक तसेच श्रीमद्भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे पठण सादर केले.
कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध नाटककार श्री. दुर्गेश बाली यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, नाटक ही अशी कला आहे जी दृक्-श्राव्य माध्यमातून थेट प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचते. संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीत नाटकाला समर्पित केले. संगीत नाटकाची परंपरा लोकांसमोर प्रभावीपणे मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, आपले जीवनदेखील एका नाटकाप्रमाणेच आहे. जीवनाच्या रंगमंचावर प्रत्येक व्यक्ती विविध भूमिका पार पाडत असते. विद्यार्थ्यांनी नाट्यकलेत सहभागी होऊन आपल्या सर्जनशीलतेला वाव द्यावा.
श्री. मानसिंह शरद यांनी विद्यार्थिनींना संगीत, नाट्य, साहित्य आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये आवड निर्माण करून आपले जीवन समृद्ध करण्याचे आवाहन केले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी अल्पायुष्यातही आपल्या कार्यातून समाजासमोर आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक-सांस्कृतिक परिषद, मध्य प्रदेश प्रांताच्या अध्यक्षा डॉ. नेत्रा रावणकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या यंत्रयुगात संगीत, साहित्य आणि नाटक या कला तणावमुक्त जीवन जगण्याची कला शिकवतात. तसेच व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासात या कलांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन छात्रावासातील विद्यार्थिनींनी केले. श्रीमती अंजली वैशंपायन यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी अशोक रावणकर, प्रीती तेलंग, पद्मा कुबे, टीना सोलंकी आणि विजेता शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
(सद्वार्ता)